नारी शक्ति को समर्पित "रचना पर्व"
नारी शक्ति को समर्पित "रचना पर्व"
जवळपास एका शतकाहून जास्त काळ 8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो. जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पण का? याचे उत्तर फारसं कुणाला माहीत नसतं म्हणूनच या दिवसाचा संपूर्ण आढावा प्रस्तुत लेखामध्ये घेऊन आजच्या युद्धजन्य युगामध्ये जागतिक महिला दिनाची अपरिहार्यता कशी आहे हे जाणून घ्यायचे आहे. त्यासाठी प्रथम जागतिक महिला दिनाचा थोडक्यात आढावा घेऊन आजच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये महिलावर होणारे अन्याय अत्याचार व त्यावरील उपाय यांचा विचार करावयाचा आहे.
जागतिक महिला दिनाचा इतिहास :
क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला. याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.
यानंतर एका वर्षाने सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिका या पक्षाने पहिल्या राष्ट्रीय महिला दिनाची घोषणा केली. हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आणली ती क्लारा झेटकीन या महिलेने. त्या साम्यवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्या होत्या आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या ही होत्या. त्यांनी ही कल्पना सर्वप्रथम काम/नोकरी करणाऱ्या महिलांच्या परिषदेत कोपेनहेगनमध्ये 1910 साली मांडली होती. त्या परिषदेला 17 देशांमधून 100 महिला उपस्थित होत्या. सगळ्यांनी क्लारा यांची कल्पना एकमुखाने मान्य केली.
त्यानुसार पहिला जागतिक महिला दिवस 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँडमध्ये साजरा केला गेला होता. त्याची शताब्दी 2011 साली साजरी झाली.
महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता 1975 साली मिळाली, तर प्रत्येक वर्षांची खास थीम स्वीकारायला सुरुवात झाली 1996 साली. पहिलं घोषवाक्य होतं ‘भूतकाळ साजरा करत असताना भविष्याची धोरणं ठरवणं.’
सध्या जागतिक महिला दिन हा महिलांच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचे मैलाचे दगड साजरे करण्याच्या उद्देशाने सर्वत्र साजरा केला जातो. तसंच या दिवशी अजूनही समाजात अस्तित्वात असलेल्या असमानतेविरोधात निदर्शनंही केली जातात. महिलांच्या समस्या मांडण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यासाठी या दिवसाचे अवचित्य साधले जाते. पण एका दिवसापुरते महिलांकडे लक्ष देऊन चालणार नाही तर आजच्या युद्धजन्य युगामध्ये युद्धामुळे खास करून निर्माण झालेले महिलांचे विविध प्रश्न मांडणे व त्याचे निराकरण करणे यासाठी सातत्याने कार्य होणे आवश्यक आहे.
क्लारां झेटकिन यांनी जेव्हा महिला दिवसाची कल्पना मांडली तेव्हा त्यांच्या मनात कोणतीही ठराविक तारीख नव्हती. ती तारीख ठरली 1917 साली.
तेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं आणि त्यादरम्यानच रशियन महिलांनी ‘भाकरी आणि शांतता’ अशी मागणी घेऊन संप पुकारला. चार दिवसांनी राजकीय उलथापालथ झाली, रशियन झारना पद सोडावं लागलं आणि त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारनं महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
रशियात तेव्हा ज्युलियन कॅलेंडर वापरलं जात होतं. ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे ज्या दिवशी महिलांनी संप पुकारला त्या दिवशी तारीख होती 23 फेब्रुवारी. ग्रेगोरियन कॅलेंडर (जे आज आपण सगळीकडे वापरतो) त्यानुसार ही तारीख होती 8 मार्च. त्यामुळेच त्या ऐतिहासिक संपाची आठवण म्हणून 8 मार्चला जागतिक महिला दिवस साजरा केला जातो.
महिला दिन सुरू झाला, त्यासुमारास अनेक देशांत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. युकेमध्ये 1918 साली तर अमेरिकेत 1920 साली त्यासंदर्भातला कायदा पास झाला.
ब्रिटनमध्ये महिलांना हा अधिकार मिळवून देण्यात विमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन या पक्षानं महत्त्वाचं योगदान दिलं. या संघटनेच्या ध्वजामध्ये जांभळ्या, हिरव्या आणि पांढऱ्या रंगांचा वापर करण्यात आला होता आणि हेच रंग महिला दिनाचं प्रतीक बनले.
जागतिक महिला दिनाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार “जांभळा रंग न्याय आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे, हिरवा रंग आशेचं प्रतीक आहे तर पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक आहे. अर्थात शुद्धता ही संकल्पनाच तशी वादग्रस्त आहे.” महिला हक्कांच्या आणि समानतेच्या लढ्याशी जांभळ्या रंगाचं नातं असल्यानंच हा रंग महिला दिनाचं एक प्रतीक बनला आहे.
प्रत्येक महिला दिवसाला वेगवेगळ्या थीम असतात महिलांचे प्रश्न तत्कालीन परिस्थिती यावर महिला दिन कसा साजरा होतो हे ठरते. भारतामध्ये महिला दिवस हा वेगवेगळ्या उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा केला जातो. तर जागतिक महिला दिन हा रशियासकट अनेक देशांमध्ये राष्ट्रीय सुटीचा दिवस असतो. रशियात या काळात फुलांची विक्री चौपट होते. चीनमध्ये 8 मार्चला अनेक महिलांना कामाच्या ठिकाणी हाफ डे दिला जातो.
इटलीमध्ये जागतिक महिला दिनाला फेस्टा डेला डोना असंही म्हणतात. या दिवशी महिलांना मीमोसाची फुलं दिली जातात. याची सुरुवात कधी झाली हे सांगता येणार नाही पण असं म्हणतात की दुसऱ्या महायुद्धानंतर रोममध्ये याची सुरुवात झाली.
अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना वूमन्स हिस्ट्री मंथ (महिलांच्या इतिहासाचा दिवस) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्राध्यक्षांकडून अमेरिकन महिलांच्या यशाचं कौतुक करणारं मानपत्र काढलं जातं.
गेल्या वर्षी युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जेव्हा युक्रेनमधून महिला आणि मुलं जागतिक महिला दिनाच्या दिवशी युरोपातल्या हंगेरी या राष्ट्रात पोचली तेव्हा त्याचं स्वागत फुलं देऊन करण्यात आलं.
युक्रेड रशियाच्या युद्धामध्ये महिला जगताला आपलं कुटुंब सोडून विस्थापित होण्याची झळ बसली अशीच झळ आता इस्रायल व पॅलेस्टाईन युद्धामध्ये महिलांना बसत आहे. या महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोणताही भेदभाव न ठेवता कार्य होणे आवश्यक आहे.
2023 सालच्या महिला दिनासाठी संयुक्त राष्ट्रांची थीम – ‘डीजी ऑल : संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी होती.या थीमचा उद्देश आहे की जगभरात ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणात जे योगदान देत आहेत ते ओळखून त्याचा यथोचित सन्मान करावा.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डिजिटल लिंग असमानतेमुळे महिला आणि मुलींच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हेही शोधण्याचा प्रयत्न केला गेला. संयुक्त राष्ट्रांच्या एका अंदाजानुसार इंटरनेटचा अॅक्सेस नसल्याने कमी आणि मध्यम उत्पन्न गटातल्या देशांच्या जीडीपीला 2025 पर्यंत 1.5 ट्रिलीयन डॉलर्सचा फटका बसू शकतो.
या बरोबरच इतरही थीम होत्या . जागतिक महिला दिनाच्या वेबसाईटवर त्यांचा उल्लेख तुम्हाला आढळून येईल. यात असं म्हटलं की ‘महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं’ तसंच ‘महिलांबद्दल असलेल्या जुन्या विचारधारांना तोडणं, त्यांना कमी लेखलं जातं याकडे लक्ष वेधणं, आणि त्यांचा सर्वांगिण विकास होईल हे पाहाणं’ अशाही काही थीम साजऱ्या केल्या गेल्या.
युनायटेड नेशन्सने वर्ष 2024 ची थीम 'महिलांमध्ये गुंतवणूक करा: प्रगतीचा वेग वाढवा' अशी केली आहे ज्यात आर्थिक अशक्तीकरणावर लक्ष केंद्रित केले आहे, तर या वर्षासाठी मोहिमेची थीम 'इन्स्पायर इनक्लूजन' आहे. हे समाजाच्या सर्व क्षेत्रांमधील विविधता आणि सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करते. या मोहिमेद्वारे, समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणि सक्षमीकरणाचे महत्त्व ओळखण्यावर आणि लैंगिक समानता वाढविण्यासाठी समावेशाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यावर जोर देण्यात आला आहे.
या थीमला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर वर्तमान काळात युद्धामुळे विस्थापित झालेल्या महिलांसाठी मग त्या युक्रेनचा असो किंवा पॅलेस्टाईनच्या कोणताही भेदभाव न करता भरीव कार्य होणे आवश्यक आहे. व त्यासाठी नुसते संयुक्त राष्ट्रसंघाने चे नव्हे तर संपूर्ण जगाने एकमताने सहकार्य करणे आवश्यक आहे. जगाला वसुधैव कुटुम्बकम म्हणजे हे विश्वचि माझे घर असा संदेश देणारा भारत यात पुढाकार घेऊ शकतो. त्याचप्रमाणे भारतातही मणिपूर पश्चिम बंगाल, राजस्थान इत्यादी ठिकाणी महिलांवर जे अत्याचार झाले त्याविषयी भारताने कठोर पावले उचलणे व त्या पीडित महिलांना मदत करण्याबरोबरच असे गुन्हे पुन्हा घडू नयेत म्हणून कठोर कायदे करून पाऊल उचलणे तसेच समाजात जनजागृती करणे ही आवश्यक आहे. महिला दिनानिमित्त हे सर्व जगासमोर मांडणे व यातून महिलांच्या उन्नतीचा एक मार्ग काढणे आपणा सर्वांची जबाबदारी आहे. तरच यावर्षीची ही थीम खऱ्या अर्थाने सार्थक की लागेल.
महिलांसाठी घडलेले काही सकारात्मक बदल
गेल्या काही वर्षांत काही सकारात्मक बदलही दिसून आले. महिला हक्क संस्थांनी सलग 10 वर्षं दिलेल्या लढ्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये युरोपियन संसदेने कायदा केला की पब्लिकली ट्रेडेट कंपन्यांच्या बोर्डांवर जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधित्व मिळेल. 2026 पर्यंत हे करण्याचे आदेश दिलेले आहेत. या प्रकरणी युरोपियन युनियनने म्हटलं की, “अनेक महिला उच्चपदांसाठी लायक आहेत. या नव्या कायद्याने त्यांना संधी मिळेल,”
अर्मेनिया आणि कोलंबियासारख्या देशांमध्ये पालकत्व रजेच्या कायद्यांमध्ये सुधारणा केली गेली. स्पेनमध्ये मासिक पाळी आरोग्य तसंच गर्भपातासाठी रजेची तरतूद केली गेली. बिजिंग 2022 मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 45 टक्के महिला खेळाडू होत्या. 2023 साली महिलांचा फिफा वर्ल्ड कप झाला. यात 36 टीमनी भाग घेतला. या स्पर्धेच्या आधी अमेरिकेच्या फुटबॉल महासंघाने एका करारावर सही करत म्हटलं की आता महिला आणि पुरुष खेळाडूंचं मानधन सारखं असेल.
युद्ध हे कोणत्याही कारणासाठी झालेले असो , लढले गेलेले असो, अथवा युद्ध समस्या निराकरणासाठी उदभवले असो तरीही युद्धोत्तर काळाने मानवी समाजासाठी अनेकविध प्रकारच्या समस्यांना जन्म दिलेला आपण पाहत आहोत. झालेल्या बहुतेक युद्धांनी मानवी समूहात संकटेच आणले आहेत. त्यातल्या त्यात अगोदरच साधारण वातावरणात महिलांचे प्रश्न हे सागरासारखरे असतात. युधोत्तर काळात तर महिलांचे प्रश्न अनेक महासागरांचे रूप धारण करून समस्यांचा पर्वत नवे महापर्वतच उभा करत असतात. महिला ही उपभोगाची वस्तू आहे अशी काही मानवत शरीरांतर्गत व वैचारिक विकृती असल्याने अवर्णनीय व अमानवीय अत्याचारांची नोंद झालेली नसावीत यात शंका नही. खासकरून युद्ध ज्या भूमीत लढले जात असते त्या भूमीतील युद्धकाळातील महिलांचे प्रश्न भयंकर असाता त्यातही खासकरून संदर्भित भूमीतील पराभूत मानवी समुदायाच्या महिलांचे प्रश्न हे अवर्णनीय व अतिभयंकरच असातात यात तिळमात्र शंका नाही, त्याला कारण म्हणजे महिला ही भोगवस्तु आहे अशी मानवी विकृती.
युद्धातील बहुतेक जय व्यक्ती हा पराजय व्यक्तीची चल, अचल, म्हणजेच स्थावर जंगम संपत्तीसह महिलांवर आपला हक्क प्रस्थापित करत असतो. यातूनच सर्व समस्या निर्माण होतात.
गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तान, इराण, आणि अमेरिकेसारख्या देशांमधल्या महिला आपल्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत. तर युक्रेन – रशिया, इस्रायल – पॅलेस्टाईन या युद्धांमध्ये अनेक मानवी हक्कांचे उल्लंघन दोन्ही बाजूंनी झाले आहे. याचा अधिक फटका स्त्रियांनाच बसला आहे असे दिसून येते.
अफगाणिस्तानाता तालिबान पुन्हा सत्तेत आल्यामुळे महिलांच्या शिक्षणात बाधा आली आहे, त्यांना कॉलेजमध्ये जाता येत नाही, नोकरी करता येत नाही, पुरुष सोबत्याशिवाय लांबवरचा प्रवास करता येत नाही, तसंच घराबाहेर पडल्यानंतर त्यांनी आपला चेहरा झाकावा असे आदेश आहेत.
इराणमध्य 22-वर्षीय महसा अमीनला केस न झाकल्यामुळे इराणच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर झालेल्या मारहाणीत तिच मृत्यू झाला. त्यानंतर इराणमध्ये आंदोलनांची लाट उठली आहे. महिला आणि पुरुष कार्यकर्ते एकत्र येऊन महिला हक्कांची तसंच राजकीय नेतृत्व बदलण्याची मागणी करत आहेत. ‘महिला, आयुष्य, स्वातंत्र्य’ या तीन शब्दांवर जोर देत, घोषणा देत आंदोलनकर्ते आपल्या हक्कांची मागणी करत आहेत.
प्रशासनाने या लोकांना दंगलखोर म्हटलं आहे आणि या आंदोलनात जवळपास 500 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच प्रमाणे जवळजवळ सर्व मुस्लिम राष्ट्रांच्या मध्ये महिलांची परिस्थिती फारशी चांगली नाही. त्यांच्यावर अनेक अनावश्यक व अमानवीय बंधने लादली गेलेली आहेत. धर्माच्या नावावर जनजागृतीलाही तेथे मज्जाव आहे त्यामुळे समाज सुधारणेचा अभाव अशा देशांमध्ये जाणवतो.
तर दुसरीकडे स्वतःला प्रगत व आधुनिक विचारांचा म्हणावीनाऱ्या अमेरिकेसारख्या देशाच्या सुप्रीम कोर्टाने महिलांना गर्भपाताचा हक्क नाकारला. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निदर्शनं आणि आंदोलनं झाली.
अनेक अमेरिकन महिला गर्भपातासाठी मेक्सिकोत गेल्या कारण त्या देशात 2021 साली गर्भपात कायद्याने गुन्हा नाही असा निर्वाळा देण्यात आला होता.
युद्धानंतर युक्रेनमधल्या महिलांना आपल्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाला सामोरं जावं लागत आहे. तर पॅलेस्टाईनी अतिरेक्याने इस्रायलवर केलेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये इस्रायली स्त्री, पुरुष व मुले यांच्या हत्या करत काही लोकांना बंदी बनवले या सर्व प्रकारात इस्रायली महिलांवर अत्याचार ही केले. या प्रकारामुळे पेटलेल्या पॅलेस्टाईन इसराइल युद्धात पॅलेस्टाईनी महिलांचेही शोषण होत आहे. हे ही नजरेआड करता येणार नाही.
हे चित्र बदलायचे असेल तर महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. युद्धामध्ये सुद्धा आपल्या महिलांप्रमाणेच शत्रू पक्षातील महिलांना ही समान वागणूक देण्याची प्रवृत्ती राजकर्त्यामध्ये असली पाहिजे. त्यासाठी नुसतेच वसुधैव कुटुम्बकम म्हणून चालणार नाही तर भारतीय संस्कृती व शिवरायांचे स्त्रियांचा आदर करण्याचे धोरण व युद्धात सुद्धा शत्रू पक्षाकडील महिलांचाही आदर राखला जावा हा त्यांचा दंडक जागतिक पातळीवर पोहोचवणे आवश्यक आहे. राजमाता जिजाबाई या आपल्या मुलाच्या अर्थात शिवाजी महाराजांना युद्धकाळात एक कडक व निर्वाणीचा संदेश देत असत. त्यांच्या एकंदरीत आकलनानुसार पदप्राप्त , सत्ताप्राप्त, अधिकार प्राप्त लोकांकडूनच युद्ध काळात स्त्रियांवर अत्याचार केले जातात यावर राजमाता जिजाबाई ठाम होत्या. त्यांच्या संदेशा नुसार आपल्या राज्यात दोन तीन किल्ल्यांची संख्या कमी राहिली तरी चालेल , राज्याच्या विस्तारात वाढ नाही झाली तरी संकोच नको परंतु स्त्रियांच्या आयुष्याची राखरांगोळी करुन, मायलेकींची ताटातूट करून राज्य उभे करता कामा नये. राजमाता जिजाबाई या ठिकाणी एक स्री समुदायाचे प्रतिनिधित्व करून हा संदेश देत असावेत ही बाब अधोरेखित करायला हरकत नसावी. जिजाऊ व शिवरायांनी घालून दिलेला स्त्री सन्मानाचा आदर्श वस्तू पाठ जगापर्यंत पोहोचवणे हे भारतीयांचे कर्तव्य आहे.
जगाच्या विचार करत असताना भारतातही स्त्रियांवर अत्याचार होताना दिसून येतात पण त्यावर उपाय म्हणून नुकताच भारत सरकारने कठोर कायदे करण्याचा निर्णय घेतला आहे. व त्याप्रमाणे एक कायदा जो अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्याच फाशीची शिक्षा देण्याचा शिफारस करतो तो पासही करण्यात आला आहे. पण नुसते कायदे पास करून चालणार नाही तर त्याची कडक अंमलबजावणी ही करावी लागेल. त्याचप्रमाणे जनजागृती करून स्त्रियांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन ही बदलावा लागेल. तर आणि तरच देशपातळीवर असो वा जागतिक पातळीवर असो महिलांची स्थिती सुधारण्यास मदत होईल व अशा जनजागृतीसाठी जागतिक महिला दिवस मोलाची भूमिका बजावू शकतो यात वाद नसावा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युद्धजन्य परिस्थितीतही मानवी हक्कात महिलांच्या सन्मानाने जगण्याचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी उपक्रम राबवता येतील याच जनजागृतीतून पुढील काळात महिलांचे जीवन सुसह्य होऊ शकेल अशी आशा करण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे आजच्या घडीला युद्धाच्या झळा सोसत असणाऱ्या युक्रेन व पॅलेस्टाईन मधील महिलांसाठी जमिनी पातळीवर काम करणे आवश्यक आहे याची जगाला जाणीव करून देण्याचाही मानस आपण ठेवला पाहिजे. माझ्यामते तरी महिला दिनाची आजच्या घडीला हीच खरी थीम असावी यातूनच या युद्ध पिढीत महिलांच्या अश्रू पुसले जातील तेव्हाच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल.
निष्कर्ष :
1. आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करणे महत्त्वपूर्ण व गरजेचे आहे.
2. जगात हा दिवस आज साजरा होत असताना देखील महिलांचे प्रश्न संपलेले नाहीत.
3. महिलांच्या समस्या कडे लक्ष वेधून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी या दिवसाचे अवचित्य साधून उपक्रम राबवता येऊ शकतात.
4. आजच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये महिलांचे प्रश्न उग्र बनत आहेत.
5. युद्धजन्य महिलांच्या परिस्थितीचा विचार करता त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची महत्त्वाची भूमिका असू शकते.
6. महिलांचा मानवाधिकार हक्कासाठी जनजागृती व कायदे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे अवचित्य साधून मागणी करता येईल.
7. आंतरराष्ट्रीय महिला दिनातून युद्धजन्य महिलांचे जीवन सुसह्य करण्यासाठी मदत करून त्यांच्या हक्कांचे संरक्षणासाठी आवाज उठवता येऊ शकतो.
संदर्भ ग्रंथ :
1. "UN Women Watch | International Women's Day - History". www.un.org (इंग्रजी भाषेत). 2018
2. International Women's Day –". UN.org. Retrieved February 21, 2013.
3. महिला आणि विस्थापन: संकटात सामर्थ्य" . रेड क्रॉसची आंतरराष्ट्रीय समिती. मार्च 2, 2010. 14 जून 2010
4. आंतरराष्ट्रीय महिला दिनाची समाजवादी मुळे" . अल जझीरा अमेरिका . 7 मार्च 2015
5. रुथचाइल्ड, रोशेल गोल्डबर्ग (2012). "पश्चिम ते पूर्व: आंतरराष्ट्रीय महिला दिन, पहिला दशक". अस्पेसिया . ६ : १-२४.
- लेखिका : प्रा. डॉ. रेश्मा आझाद पाटील
डी. बी. एफ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर. रविवारपेठ, सोलापूर पिन.को. 413003
मो. नं. 9158703255
ई. मेल ID: drreshmapatil06@gmail.com
अस्वीकरण (Disclaimer): इस लेख/कविता/रचना में व्यक्त किए गए विचार लेखक के अपने हैं और उनकी व्यक्तिगत दृष्टि को दर्शाते हैं। ये विचार स्मिता नागरी लिपि साहित्य संगम/शोध निरंजना के संपादक अथवा संपादकीय मंडल के सदस्यों या उनके विचारों का प्रतिनिधित्व नहीं करते।